शेतकरी एकजूट झाली की कोणतं वादळ येईल हे सांगू शकत नाही. मग ते कधी चांगलं असतं तर कधी आंदोलनाच. शेतमाल व्यापाऱ्यांकडे विकून व्यापारी चढ्या भावाने तोच मान सामान्यांना विकतात. त्यामुळे शेतकरी मात्र काळात जातो आणि व्यापाऱ्यांची मात्र चांदी होते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पिकासाठी झालेला खर्चही निघेनासा होतो. परंतु यात शेतकऱ्यांनी जर एकजूट होऊन पाऊल उचलले तर व्यापाऱ्यांना मागे टाकत स्वतः जबरदस्त फायदा कमावू शकतात. याचे उदाहरण आता समोर आली आहे. या गावातील शेतकरी असं म्हणत आहेत की, आता टोमॅटोही आमचा, दरही आमचा आणि विक्री ही शेतकऱ्यांच्या बांधावरच. चला तर मग हे अनोखी संकल्पना सविस्तर जाणून घेऊयात.
सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यातील तडवळे गावात भरपूर टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी एक अनोखी संकल्पना राबवण्याचा निर्धार केला आहे. ते म्हणत आहेत की, आता टोमॅटोही आमचा, दरही आमचाचं… आणि विक्रीही होणार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर. या गावातील शेतकऱ्यांनी आपापसात एकी बांधली आहे. याचा फायदा त्यांना होत आहे. त्यांनी शक्कल लढवून मुंबई आणि पुण्याच्या घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांशी बोलून आपल्या टोमॅटोचा दर ठरवला आणि त्यानुसारच आता ते व्यवहार करतात. त्यामुळे त्यांच्या टोमॅटोची विक्री बांधावरच होते आणि पाहिजे तो दरही मिळतो. यामुळे महाराष्ट्रभरात या गावाची चर्चा सुरू आहे.
टोमॅटो उत्पादक गाव
साताऱ्यातील तडवळे गावात जवळपास 200 एकर पेक्षा अधिक एकरावर टोमॅटोची लागवड केली जाते. या गावातील 80 ते 90 टक्के शेतकरी टोमॅटोचे पीक घेतात. त्यामुळे या गावाची ओळख पंचक्रोशीत टोमॅटो उत्पादक म्हणून झाली आहे. टोमॅटो कमी कालावधीत उत्पन्न देतो म्हणून सर्वांनी या पिकाची निवड केली आहे. युवा तरुणांना नोकरीतून जितके पैसे मिळणार नाहीत त्याच्या दुप्पट पैसे ते या टोमॅटोच्या पिकातून काढत आहेत.
वर्षाला 10 ते 15 कोटींची उलाढाल
गेल्या 24 वर्षांपासून या गावात केवळ टोमॅटोचे पीक अधिक घेतले जाते. त्यामुळे या गावातून वर्षाला हजारो टन टोमॅटोची विक्री केली जाते. याविक्रीतून तळवळी गावातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची 10 ते 15 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे तळवड गावातील ग्रामस्थांनी ‘टोमॅटोही आमचा आणि दरही आमचाच… आणि विक्री ही शेतकऱ्यांच्या बांधावरच!’ असा संकल्प केला आहे.