शेतजमीन जरी शेतकऱ्याच्या नावावर असली तरी देखील सरकारने काही शेती कायदे बनवले आहेत. या शेती कायद्याचे शेतकऱ्यांना पालन करावे लागते. त्याचप्रमाणे सरकारनं शेती जमिनींच्या मालकी हक्काबाबत देखील नियमावली आखून दिलेल्या आहेत. यानुसार जमीन भोगवट्याचे 2 प्रकार पडतात. चला तर मग जमिनीचे हे दोन प्रकार कोणते आहेत आणि याचे एकमेकांत रूपांतर करण्याची प्रक्रिया काय आहे हे जाणून घेऊयात.

तर शेतकरी मित्रांनो जमीन भोगवट्याचे 2 प्रकार पडतात. ते म्हणजे भोगवटादार वर्ग 1 आणि भोगवटादार वर्ग 2 होय. कधी कधी शेतकऱ्यांना ही जमीन भोगवटा वर्ग 2 मधून भोगवटा वर्ग 1 मध्ये रूपांतरित करायची असते. तर ही रूपांतर करण्याची प्रक्रिया सोपी आहे, मात्र तुम्हाला या प्रक्रियेसाठी काही कायदेशीर पद्धतींचे पालन करणे गरजचे आहे. आता याची सोपी प्रक्रिया काय आहे हे पाहुयात.
जमिनीचे रूपांतरण करण्यासाठी अर्ज कसा करावा?
जर तुम्हाला शेत जमीन भोगवटा वर्ग 2 मधून भोगवटा वर्ग 1 मध्ये रूपांतरित करायची असेल तर, तर तुम्हाला सर्वप्रथम तहसीलदार कार्यालयात अर्ज करावा लागेल. तुम्हाला हा अर्ज करताना तुमचे नाव, पत्ता तसेच जमीन मिळाल्याची अधिसूचना क्रमांक आणि गट क्रमांक सोबतच जमिनीचे क्षेत्रफळ नमूद करावे लागेल. तहसिलदारांकडून अर्ज मंजूर केल्यानंतर तुम्हाला नजराण्याचे चलन देण्यात येते. त्यानंतर शुल्क भरून तलाठ्यांकडून गाव नमुना 6 मध्ये नोंद केली जाते. या प्रक्रियेनंतर 2 चा शेरा हटवून वर्ग 1 ची नोंद करण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे
जमिनीचे रूपांतर करण्यासाठी तुम्हाला अर्जासोबत महत्वाची खालील कागदपत्रे जोडावी लागणार आहे –
- 50 वर्षांचा 7/12 उतारा
- सर्व फेरफार नोंदी
- सीमा दर्शवणारा नकाशा
- आकरबंद मूळ प्रत
- जमीन मिळाल्याचा दस्तऐवज
- तलाठी कार्यालयाचा वनजमीन उतारा
जमीन रूपांतरणासाठी किती खर्च येईल?
तुम्हाला कृषी जमीन बाजारमूल्याच्या 50% शुल्क भरावे लागेल. औद्योगिक व वाणिज्यिक वापरसाठी बाजारमूल्याच्या 50% शुल्क भरावे लागेल. रहिवासी वापर (कब्जा हक्काने) – 15% शुल्क भरणे आवश्यक आहे. रहिवासी वापर (भाडेपट्ट्याने) – 25% शुल्क भरावे लागेल.