मुंबईत घर घेण्याची इच्छा असलेल्यासाठी मोठी बातमी; म्हाडाच्या 2030 घरांसाठी अर्ज नोंदणीस होणार लवकरच सुरुवात, सप्टेंबरमध्ये असेल घरांची सोडत

मुंबईत घर असावे असे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी आम्ही एक मोठी बातमी घेऊन आलो आहोत.  महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड,  कोपरी, पवई येथील गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात येणार आहे. आज म्हणजेच दिनांक 8 ऑगस्ट, 2024 रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रांमध्ये आणि म्हाडाच्या संकेतस्थळावर संबंधित जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  

म्हाडा सदनिकांसाठी अर्ज स्वीकारण्यास होत आहे सुरुवात

सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेला 9 ऑगस्ट, 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून सुरुवात होणार होणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 4 सप्टेंबर, 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. तसेच अर्जदारांना घरांसाठी ऑनलाईन अनामत रक्कम भरण्यासाठी दिनांक 4 सप्टेंबर, 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत मुदत देण्यात येणार आहे.

संगणकीय सोडत या तारखेस काढण्यात येणार

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक (MHADA) असलेल्या मुंबई मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या घरांच्या लॉटरीसाठी प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता काढण्यात येणार असून सोडतीचे ठिकाण मंडळातर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.  

म्हाडाची घरे आणि उत्पन्न गट

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाच्या सन 2024 च्या सोडतीत पुढील उत्पन्नगटाप्रमाणे सदनिकांची संध्या जाहीर करण्यात येणार आहे.  

· अत्यल्प उत्पन्न गट- (Economically Weaker Section) ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न  सहा लाखापर्यंत आहे अशांसाठी 359 सदनिका

· अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group)  ज्यांते वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नऊ लाखापर्यंत  आहे अशांसाठी 627 सदनिका

· मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न बारा लाखापर्यंत आहे अशांसाठी 768 सदनिका

· उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group) ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न बारा लाखांपेक्षा जास्त आहे अशांसाठी  276 सदनिका

यावर्षीच्या म्हाडांच्या घरांच्या सोडतीमध्ये मुंबई मंडळाने बांधलेल्या 1327 सदनिका, विकास नियंत्रण नियमावली 33 (5), 33 (7) व 58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock) म्हणून म्हाडाला प्राप्त झालेल्या 370 सदनिका आणि मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या 333 सदनिकांचा  देखील समावेश आहे.

म्हाडाच्या घरासाठी येथे अर्ज करा

म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थावर म्हणजेच   https://housing.mhada.gov.in या लिंकवर क्लिक करुन तुम्ही तुमच्या उत्पन्न गटाप्रमाणे घरासाठी अर्ज नोंदणी आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण करु शकता.  म्हाडाने अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती आणि हेल्प फाईल या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

म्हाडाचे आवाहन

म्हाडाच्या सदनिकांच्या वितरणाच्या प्रक्रियेमध्य अनेकजण गैरव्यवहार करताना किंवा अर्जदार नागरिकांकडून विनाकारण पैसे घेताना दिसून येतात त्यासाठी म्हाडाने यावेळी जाहीर आवाहन केले आहे की, “म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशासकीय व्यक्तीशी परस्पर व्यवहार केल्यास आणि त्या व्यवहारात अर्जदाराचे आर्थिक नुकसान झाल्यास म्हाडा महामंडळ कोणत्याही प्रकारच्या फसवणूकीस जबाबदार राहणार नाही”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top