भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील जवळपास निम्म्याहून अधिक नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. परंतु, असे असले तरी देखील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांच्या शेतमालाला व्यवस्थित भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. तसेच दुसरीकडे शेतकऱ्यांची शारीरिक परिस्थिती कमजोर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे सर्वच स्त्रोत बंद होतात. अशावेळी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वृद्ध अवस्थेत सरकारकडून आर्थिक पाठबळ दिले जाते. चला तर मग जाणून घेऊयात ही योजना कोणती आहे आणि सरकार शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत किती आर्थिक पाठबळ देते.
पंतप्रधान किसान मानधन योजना
केंद्र सरकार शेतकऱ्यांचा हिताचा नेहमीच विचार करत असते. यामुळेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना सरकार राबवत आहे. देशात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही राबवली जात आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. परंतु केंद्र सरकार आता वृद्ध शेतकऱ्यांचा देखील विचार करत आहे. वृद्ध शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत वृद्ध शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येते. यामुळे वृद्ध शेतकऱ्यांचे उरलेले आयुष्य हे सुरक्षित होते.
कसा मिळेल योजनेचा लाभ?
पंतप्रधान किसान मानधन योजनेसाठी 18 ते 40 वयोगटातील शेतकरी अर्ज करू शकतात. शेतकऱ्याचे जेवढे वय असेल त्यानुसार शेतकऱ्याच्या गुंतवणुकीची रक्कम ठरवण्यात येते. गुंतवणुकीची रक्कम ही केवळ 55 रुपये ते दोनशे रुपये इतकी असू शकते. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकरी सहजपणे घेऊ शकतात. यातच उदाहरण पाहायचं झालं तर, जर एका 18 वर्षीय शेतकऱ्याने प्रति महिना आला 55 रुपये गुंतवले तर त्याला वयाच्या साठव्या वर्षापर्यंत ही रक्कम भरत रहावी लागेल. यानंतर त्याच्या निवृत्तीकाळात म्हणजेच वयाच्या साठाव्या वर्षानंतर सदर शेतकऱ्याला प्रति महिना तीन हजार रुपये मानधन देण्यात येते. एकंदरीत या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पेन्शन देण्यात येते.
पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
पंतप्रधान किसान मानधन योजनेचा लाभ केवळ असे शेतकरी घेऊ शकतात ज्यांच्याकडे दोन हेक्टर पेक्षा कमी शेत जमीन असेल. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही आवश्यक कागदपत्रांची देखील पूर्तता करावी लागणार आहे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड बँक खात्याचे पासबुक, तुमचा कायमचा पत्ता, तसेच तुमचा मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असणे अनिवार्य आहे. अन्यथा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतो.