जसे भाऊ तिथे भाऊकी तसेच शेत म्हणले की, बांध हा आलाच. मग या बांधावरून भावांची किती भांडण होतात याची उदाहरणे आपण तर पाहतच असतो. भावकीचे सोडा पण इतरही लोक बांधावरून वाद करतात. या वादावर तोडगा काढण्यासाठी जमिनीची मोजणी करणे प्रचंड महत्त्वाचे असते. जमिनीची मोजणी केली की दोन्ही शेतकऱ्यांचे शेत त्यांना व्यवस्थितपणे मिळते. परंतु जमिनीची मोजणी करणे काही हलके काम नाही. यासाठी खूप झगडावे लागते. हे तुम्ही ऐकलेच असेल. परंतु आता जमिनीची मोजणी चुटकीसरशी होणार आहे. कारण आता तुम्ही जमिनीची मोजणी ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहात. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊयात.

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की जमिनीची ऑनलाईन पद्धतीने मोजणी कशी होते? तसेच ऑनलाईन पद्धतीने जमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज कसा आणि कोठे करावा लागेल? तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही आज तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून देणार आहोत. जमिनीची मोजणी करण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीने अर्ज करू शकता. शेतकरी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने यासाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून शेतकरी अगदी घरबसल्या आपल्या जमिनीची मोजणीसाठी अर्ज करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना अगदी घरबसल्या सातबारा वरून आपली जमीन किती आहे याची अचूक माहिती मिळणार आहे.
मोजणीचे प्रकार
आता आपण जमिनीची मोजणीचे किती प्रकार पडतात हे पाहुयात. तर जमीन मोजणीचे तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार साधी मोजणी असा आहे. ही साधी मोजणी सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये केली जाते. दुसरा प्रकार तातडीची मोजणी, ही मोजणी तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये केली जाते. तर तिसरी मोजणी अति तातडीची मोजणी असते, ही मोजणी दोन महिन्यांच्या आत केली जाते.
जमीन मोजणीसाठी फी किती आहे?
साधी मोजणी: 1 हजार रुपये
तातडीची मोजणी: 2 हजार रुपये
अति तातडीची मोजणी: 3 हजार रुपये
जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
ऑनलाइन जमीन मोजणीसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर, प्रथम तुम्हाला आपले सरकार या वेबसाईटवर जावे लागेल. त्यावर तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
त्याचबरोबर तेथे तुम्हाला तुमचा महसूल विभाग निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला अभिलेख सेवा हा पर्याय दिसेल. या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील त्यापैकी तुम्हाला जमीन मोजणी या पर्याय क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला Ordinary cases असा पर्यायही दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्हाला तेथे विचारलेली माहिती व्यवस्थित भरावी लागेल. ज्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका गाव अशी माहिती विचारली जाईल. योग्य माहिती भरल्यानंतर तुम्हाला सर्वे हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला boundary confirmation या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
तसेच तुम्हाला जमिनीचा नकाशा पोस्टाद्वारे हवा आहे की स्वतः जाऊन घ्यायचा आहे ते निवडावे लागेल.
त्यानंतर तेथे जमीन मोजणीसाठी ऑनलाईन फीचा ऑप्शन येईल त्यावर तुम्हाला तिथे सबमिट करावी लागेल.
भरलेली सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून अर्ज सबमिट करावा लागेल. अशा सरळ साध्या पद्धतीने तुम्ही जमीन मोजणीसाठी चुटकीसरशी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.