राज्यातील 34 तालुक्यांमध्ये ‘ई-पीक पाहणी’ नाहीतर होणार ‘डिजिटल क्रॉप सर्वेक्षण’; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?

शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यापैकी एक महत्त्वपूर्ण आणि पिकासाठी धोक्याची असणारी समस्या म्हणजे नैसर्गिक आपत्ती. जर पिकावर नैसर्गिक आपत्ती ओढावली, तर कोणीच काहीच करू शकत नाही. शेतकरी मात्र कर्जबाजारी होऊन पिकाची लागवड करतो आणि नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे पिक पाण्यात जाते. याच कारणामुळे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई दिली जाते. जर भविष्यात आपल्या पिकाची नासाडी नैसर्गिक आपत्तीमुळे झाली आणि त्यासाठी जर नुकसान भरपाई हवी असल्यास शेतकऱ्यांनी एपीक पाहणी करणे महत्त्वाचे आहे. आता यासाठी राज्यातील 34 तालुक्यांमध्ये डिजिटल क्रॉप सर्वेक्षण होणार आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.  

34 तालुक्यांमध्ये राबवणार डिजिटल क्रॉप सर्वेक्षण 

शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची अचूक ई पीक पाहणी करावी म्हणून राज्यामध्ये डिजिटल क्रॉप सर्वेक्षण राबवण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण राज्यांमधील 34 तालुक्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सरकारला शेतकऱ्यांच्या पिकाची अचूक माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या पिकांची किंवा पेरण्यांची नोंद सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी ई पीक पाहणी खूप महत्त्वाची आहे. वारंवार सूचना करूनही शेतकरी अनेकदा शेतात न जाता किंवा चुकीची नोंदणी करून ई पीक पाहणी करतात. त्यामुळे अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहतात. या सर्वांवरच तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने आता डिजिटल क्रॉप सर्वेक्षण सुरू केले आहे.  

काय आहे डिजिटल क्रॉप सर्वेक्षण? 

खरं सांगायचं झालं, तर ई पीक पाहणी आणि डिजिटल क्रॉप सर्वेक्षण हे जवळपास सारखेच आहे. मात्र जर शेतकऱ्यांना डिजिटल क्रॉप सर्वे करायचा असेल तर सदर शेतकऱ्याला त्याच्या क्षेत्राच्या गट हद्दीत जावे लागणार आहे. शेतकऱ्याला त्याच्या क्षेत्राच्या गट हद्दीत केल्यामुळे सरकारला त्या पिकाची अचूक माहिती या माध्यमातून मिळणार आहे. आता डिजिटल क्रॉप सर्वे प्रकल्प राज्यांमधील 34 जिल्ह्यांतील 34 तालुक्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. या यादीत तब्बल 2 हजार 858 गावांचा समावेश करण्यात आला आहे. ही पाहणी करताना शेतकऱ्यांना त्यांचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक करून त्यांच्या पिकाचा लाईव्ह फोटो अपलोड करावा लागणार आहे.    

डिजिटल क्रॉप सर्वेक्षणासाठी निवडलेल्या तालुक्यांची यादी: 

  • लातूर: जळकोट
  • हिंगोली: औंढा नागनाथ
  • ठाणे: अंबरनाथ
  • पालघर: तलासरी
  • सिंधुदुर्ग: वेंगुर्ला
  • रायगड: तळा
  • रत्नागिरी: लांजा
  • नागपूर: काटोल
  • गडचिरोली: देसाईगंज /वाडसा
  • भंडारा: साकोली
  • चंद्रपूर: सिंदेवाही
  • गोंदिया: आमगाव
  • नाशिक: देवळा
  • अमरावती: वरुड
  • बुलडाणा: बुलडाणा
  • यवतमाळ: दिग्रस
  • अहमदनगर: श्रीरामपूर
  • जळगाव: भुसावळ
  • धुळे: शिंदखेडा
  • नंदुरबार: तळोदा
  • अकोला: पातूर
  • पुणे: दौंड
  • कोल्हापूर: गगनबावडा
  • सांगली: पळूस
  • सातारा: खंडाळा
  • सोलापूर: द. सोलापूर
  • वर्धा: कारंजा (घा)
  • वाशिम: रिसोड
  • छ. संभाजी नगर: फुलंब्री
  • धाराशीव: लोहारा
  • जालना: बदनापूर
  • नांदेड: मुदखेड
  • परभणी: सोनपेठ
  • बीड: वडवणी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *