Saur Krushi Pump Yojana | शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी सरकारकडून ‘मागेल त्याला सौर कृषीपंप योजना’ राबवली जात आहे. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना सोलरवर चालणारे कृषी पंप (Saur Krushi Pump Yojana) अनुदान स्वरुपात देत आहे. यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागते. या सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांची वीज बिलापासून देखील सुटका होणार आहे. चला तर मग महावितरणकडून राबवण्यात येणाऱ्या नवीन मार्गदर्शक सूचनाबद्दल जाणून घेऊयात.

शेतकऱ्यांना महावितरणकडून आवाहन
अलीकडच्या काही काळात शेतकऱ्यांना “प्रतीक्षा यादी टाळून त्वरित पंप मिळवून देतो’ अशाप्रकारचे बनवत कॉल आणि मेसेज येत होते. या संदर्भातल्या तक्रारी महावितरणकडे आल्या त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महावितरणकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. अन्यथा लवकर सौर पंप मिळण्याच्या आशेतून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होऊ शकते.
महावितरणकडून अधिकृत निवेदन जारी
शेतकऱ्यांसाठी महावितरणकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या बनावट कॉल आणि मेसेजला बळी पडू नये. तसेच याबाबतची माहिती तत्काळ mahavitaran.consumer@mahadiscom या इमेलवर पाठवावी किंवा जवळच्या महावितरणात द्यावी. कोणत्याही अशा व्यक्तीकडे पैसे, बँकेचे तपशील किंवा OTP देऊ नये. अन्यथा तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
सौर कृषी पंपासाठी नोंदणी कशी करावी?
तुम्हाला जर तुमच्या शेतात सौर कृषी पंप बनवायचा असेल तर तुमच्या ऑनलाइन किंवा स्थानिक महावितरण कार्यालयात जाऊन या योजनेसाठी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुमच्या नावाचा समावेश हा प्रतीक्षा यादीत करण्यात येतो. त्यांनंतर निधीच्या उपलब्धतेनुसार तुम्हाला सौर कृषी पंप देण्यात येतो. त्यामुळे फावणुकीपासून सावध रहावे. त्याचबरोबर या सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांचे विजेचा खर्च वाचतो आणि शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होते.