सध्याच्या डिजिटल युगामुळे सर्वकाही डिजिटल होत चालले आहे. शिक्षण असो वा जॉब किंवा शेती या सर्वच क्षेत्रामध्ये डिजिटल क्रांती घडत आहे. आता सरकारने शेतकऱ्यांना देखील फार्मर आयडी काढणे बंधनकारक केले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र क्रमांक असेल त्यांनाच शासनाच्या योजनांचा फायदा मिळणार आहे. आता या शेतकरी ओळखपत्र क्रमांकबद्दल सरकारने नियम लागू केला आहे. चला तर मग हा नियम काय आहे ते जाणून घेऊयात.

शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक
आता राज्य सरकारने 15 जुलै 2025 पासून ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. त्याचबरोबर सरकारने याआधी 15 एप्रिलपासून कृषी विभागाच्या योजनांकरता शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक केला आहे. या निर्णयानंतर आता मदत व पुनर्वसन विभागाकडून देखील हा क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. जर शेतकऱ्याकडे हे फार्मर आयडी नसेल तर शेतकरी या मदतीचा लाभ घेऊ शकणार नाही.
शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी रकाना
जर शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामातील नुकसान मदत हवी असेल, तर त्यांनी शेतकरी ओळखपत्र काढून घेणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही. राज्य सरकारकडून याबाबतचे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे मदतीसाठी पंचनामे करून निधी दिला जातो. पण आता शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकाचा पंचनामा करताना त्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक याचा रकाना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शेतकरी ओळखपत्र क्रमांक कसा काढावा?
शेतकऱ्यांसाठी सरकारने अॅग्रिस्टॅक योजना सुरू केली आहे, यामध्ये 1 कोटी 71 लाख शेतकरी पात्र झाले आहेत. तर या शेतकऱ्यांमधील 1 कोटी शेतकऱ्यांनी आपला शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढून घेतला आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामा करताना ओळख क्रमांक भरणे अनिवार्य आहे. अन्यथा शेतकरी या अनुदानापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/या वेबसाइटवर जाऊन घरबसल्या आपला शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढून घ्यावा.