मुंबईतील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. महायुती सरकार आणि मुंबई बँकेच्या संयुक्त पुढाकाराने महिलांसाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची अभिनव योजना साकारली जात आहे. अनेक महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाचा अडसर येतो, मात्र आता तो अडसर दूर होणार आहे. कारण या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अगदी शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवणे. कर्जासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचा व्यवसाय आराखडा तपासल्यानंतर त्वरित कर्ज वितरित करण्यात येईल.
विशेष म्हणजे या योजनेत महिलांना फक्त मुद्दलाची परतफेड करावी लागेल, व्याजाची संपूर्ण रक्कम राज्य शासनाच्या चार प्रमुख महामंडळांमार्फत भरली जाणार आहे. त्यामुळे उद्योजिका बनू पाहणाऱ्या महिलांवर कोणत्याही प्रकारचा व्याजाचा बोजा राहणार नाही.
ही योजना एकटी महिला तसेच महिला गटांसाठी खुली आहे. जर पाच महिला एकत्र येऊन व्यवसाय करू इच्छित असतील तर त्यांना ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
त्याचप्रमाणे, दहा महिला एकत्रितपणे १० लाख रुपयांचे कर्ज मिळवू शकतात. हे कर्ज व्यवसायासाठी वापरता येणार असून त्यामध्ये महिला बचत गट, घरगुती उद्योग, किराणा दुकान, शिलाई काम, सौंदर्य पार्लर, खाद्यपदार्थ तयार करणे अशा विविध स्वरोजगार योजना येतात.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वैयक्तिक शेततळ्याच्या लॉटरीबाबत मोठी अपडेट
मुंबई बँकेमार्फत राबवण्यात येणारी ही योजना पारदर्शक आहे आणि अर्ज प्रक्रियाही सुलभ ठेवण्यात आली आहे.
महिलांनी बँकेत जाऊन आपली व्यवसाय कल्पना मांडावी आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा, त्यानंतर संबंधित विभागाकडून व्यवसायाची पडताळणी केली जाईल आणि कर्ज मंजूर करण्यात येईल.
यामध्ये कोणतीही दलाली, मध्यस्थी किंवा अडथळा न ठेवता महिलांना थेट आणि वेळेत आर्थिक मदत मिळणार आहे.
महायुती सरकारच्या या पुढाकारामुळे सुमारे १२ ते १३ लाख महिलांना थेट फायदा होणार आहे. मध्यमवर्गीय, गरीब, आणि आर्थिकदृष्ट्या मागास भागांतील महिलांसाठी ही योजना जीवन बदलणारी ठरेल. महिलांना भांडवलाची चिंता न करता आत्मविश्वासाने व्यवसाय सुरू करता यावा यासाठी ही योजना एक संधी आहे.